पिंपरी चिंचवड शहरात मोठा शस्त्र साठा जप्त

विक्रीसाठी आणलेले 14 पिस्तूल पकडले

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांनी मोठा शस्त्र साठा जप्त केला आहे. मध्य प्रदेश मधून विक्रीसाठी आणलेले 14 पिस्टल आणि आठ जिवंत काडतुसे पकडले असून चार जणांना अटक केली आहे.

आकाश अनिल मिसाळ (21, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), रुपेश सुरेश पाटील (30, रा. वडगाव बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव), ऋतिक दिलीप तापकीर (26, रा. सुतारवाडी, पाषाण), अजित उर्फ विकी रामलाल गुप्ता (28, रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वडमुखवाडी येथे काहीजण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस पथकाने 3 जानेवारी रोजी रात्री तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकी, दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन, मिरची पूड, नायलॉन दोरी असा ऐवज पोलिसांनी जप्त केला. आरोपी एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले.

त्या गुन्ह्यात आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी आरोपींच्या घराची झडती घेतली. त्यावेळी रुपेश पाटील आणि ऋतिक तापकीर यांच्या फ्लॅटमधून सहा गावठी कट्टे (पिस्टल) आणि जिवंत काडतूस मिळाले. तर आकाश मिसाळ याच्या घरातून चार गावठी कट्टे आणि जिवंत काडतूस मिळाले. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त केला.

आरोपी रुपेश पाटील याने भोसरी येथील अजित गुप्ता याला पिस्टल विकले असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी सापळा लावून अजित गुप्ता याला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. यामध्ये पोलिसांनी एकूण 14 पिस्टल आणि आठ जिवंत काडतुसे असा एकूण चार लाख 90 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी रुपेश पाटील आणि अक्षय मिसाळ हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. रुपेश पाटील आणि त्याच्या साथीदारांवर यापूर्वी देखील पोलिसांनी कारवाई केली आहे. पूर्वीच्या कारवाईमध्ये रुपेश पाटील आणि टोळीकडून 24 पिस्टल आणि 16 जिवंत काडतुसे जप्त केली होती. त्यानंतर देखील तो सुधारला नाही. त्याने पुन्हा मध्य प्रदेशातून पिस्टल आणून शहरात विकण्याचा काळा बाजार चालू केला. यामुळे त्याला पुन्हा एकदा जेलची हवा खावी लागली आहे.

रुपेश पाटील भोसरी आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यात फरार होता. तर त्याच्यावर चिंचवड, देहूरोड आणि भोसरी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपी आकाश मिसाळ याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.