पिस्तूलातून गोळ्या झाडून मित्राचा खून

0

पिंपरी : मावळ तालुक्यातील आढले खुर्द येथे भांडणातून  एकाने धारदार हत्याराने वार केले तर दुसऱ्याने थेट मित्रावर तीन राऊंड फायरिंग केले. यामध्ये एकजण जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे.

रोहन येवले (वय 21, रा. आढले खुर्द, मावळ) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अविनाश भोईर (23, रा. आढले खुर्द, मावळ) असं गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, संशयीत आरोपी अविनाश भोईर आणि मृत रोहन येवले हे एकाच गावातील चांगले मित्र होते. तर, दोन दिवसांपुर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर आज (शुक्रवारी) सकाळी त्यांच्यात पुन्हा वाद उफाळला. त्यावेळी रोहनने अविनाशवर धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. अविनाश यानेही रोहनवर 3 राऊंड फायर केले. यात जखमी झालेल्या रोहनला सोमाटने फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु, उपचाराआगोदरच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान, या घटनेबाबत महिती समजताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अविनाश यांच्यावर हिंजवडी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यात वाद का झाला? हे अस्पष्ट आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात आणि रुग्णालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
याप्रकरणी अधिक तपास शिरगाव पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.