अमोल कोल्हे यांनी कोणती भूमिका करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न : नाना पाटेकर

0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी केलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवर
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी गोडसेची भूमिका करणं म्हणजे गोडसेच्या प्रवृत्तीचं समर्थन करणं आहे का? असा सवाल केला. तसेच अमोल कोल्हे यांनी कोणती भूमिका करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं मत व्यक्त केलं. विशेष म्हणजे मीही नथुराम गोडसेची भूमिका केली होती, असंही नाना पाटेकर यांनी नमूद केलं. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

नाना पाटेकर म्हणाले, “अमोल कोल्हे केवळ नथुराम गोडसेची भूमिका करत आहे. ते नटही आहेत आणि राजकारणातही आहे. त्यांनी कोणती भूमिका करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर इतका वाद होण्याची गरज नाही. ‘लास्ट व्हॉईस राय – माऊंटबॅटन’ या चित्रपटात मीही नथुराम गोडसेचं काम केलं आहे, पण अनेकांना माहिती नाहीये.”

“शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्याबाबत सांगितलं आहे. अमोल कोल्हे जेव्हा राष्ट्रवादीत नव्हते तेव्हा त्यांनी ही भूमिका केली. हे नथुरामाचं समर्थन नाहीये, ती एक भूमिका केलेली आहे. गोडसेची भूमिका करणं म्हणजे गोडसेच्या प्रवृत्तीचं समर्थन करत आहेत का? कुणीतरी ती भूमिका करणारच आहे. मी अमोल कोल्हे यांचं समर्थन करत नाहीये. एक नट म्हणून अमोल कोल्हे यांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे,” असं मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं.

“खरंतर मला कुठलाच अधिकार नाही. मी काय करतो हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कुणावर टीका करण्याचा मला काय अधिकार आहे. आपण ते करू नये. कोल्हेंनी गोडसेची भूमिका केली ही काही खूप मोठी वादाची गोष्ट नाही. अजून वादाच्या अनेक गोष्टी आहेत त्यावर चर्चा करा. छोट्या छोट्या गोष्टींना फार महत्त्व देऊ नका,” असंही नाना पाटेकर यांनी नमूद केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.