मुंबई : गेल्या चोवीस तासांत उत्तर आणि लगतच्या मध्य व पश्चिम अरबी समुद्रात वादळी वारे वाहिले आहेत. याचा फटका गुजरात किनारपट्टीसह उत्तर कोकणाला बसला आहे. यानंतर आता महाराष्ट्रात एक वेगळंच अस्मानी संकट घोंघावत आहे. येत्या 12 तासांत उत्तर कोकणात धुळीचे वारे वाहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. याचा एकंदरित परिणाम मुंबईसह उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जाणवणार आहे. संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने आज मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांना धुळीच्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे. संबंधित जिल्ह्यात पुढील 12 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. येत्या बारा तासांत याठिकाणी धुळीचे वारे वाहणार आहेत. हे वारे 20 ते 30 किमी प्रतितास वेगाने वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, तसेच मास्कचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.