धक्कादायक… टीईटी परीक्षेत तब्बल 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र

0

पुणे : राज्यात गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणात दररोज नवनवीन माहीती समोर येत आहे. पुणे पोलिसांनी आजपर्यंत केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी 2019-20 परीक्षेच्या निकालात तब्बल 7880 अपात्र परीक्षार्थींचे गुण वाढवून त्यांना पात्र केल्याचे तपासात उघड झाले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7880 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे समोर आले आहे. पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर व प्रितीश देशमुख यांनी संगनमत करुन इतर आरोपींच्या मदतीने परीक्षेमधील निकालात अपात्र परीक्षार्थींचे मार्क वाढवून त्यांना पात्र करुन प्रमाणपत्र  दिले.

या प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल यांची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. 2019-20 च्या परीक्षेत एकूण 16 हजार 705 परीक्षार्थींना पात्र करण्यात आले आहे. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल 7 हजार 880 परीक्षार्थी हे अपात्र असल्याचे समोर आले आहे. तरीही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांनी ओएमआर शिट्स चा तपास केला असता 7880 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे समोर आले. या प्रकरणातील अपात्र परीक्षार्थींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, आर्थिक व सायबर उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक डी.एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे आणि त्यांच्या पथकाने  केली.

Leave A Reply

Your email address will not be published.