शहरातील शाळा, महाविद्यालये मंगळवारपासून पुन्हा सुरु होणार : आयुक्त

0

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा अर्ध सत्र कालावधीत तर 9, 10 वीच्या शाळा आणि 12 वी पर्यंतचे महाविद्यालये 1 फेब्रुवारी 2022 पासून नियमित सुरु होणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांनी घेणे आवश्यक आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना नियमांचे पालन करुन जिल्ह्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्त राजेश पाटील यांनी शाळा सुरु करण्याचा आदेश काढला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पावणे दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा 16 डिसेंबर 2021 पासून पुन्हा गजबजल्या होत्या. पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या होत्या. परंतु, कोरोनाचा नवीन विषाणू ‘ओमायक्रॉन’ची लागण झालेल्या आणि कोरोनाच्या रुग्ण संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ झाल्याने 30 जानेवारीपर्यंत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

आता रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे 1 ली 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा अर्ध सत्र कालावधीत तर 9, 10 वीच्या शाळा आणि 12 वी पर्यंतचे महाविद्यालये 1 फेब्रुवारी 2022 पासून नियमित सुरु होणार आहेत. शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा करणे, ज्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाले नाहीत. त्यांना 48 तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्र शाळा दफ्तरी ठेवण्यात यावे.

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. वर्ग खोली, स्टाफरुम मधील बैठक व्यवस्थेत सुरक्षित अंतर असावे. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करुन घ्यावी. शाळेचा परिसर दररोज स्वच्छ करावा. स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे, असे आयुक्त पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.