पिंपरी : देशातील शेतकरी-कष्टकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत आणि भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने सादर केला आहे. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामण यांना धन्यवाद देतो. भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनवणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.
केंद्रीय मंत्री निर्मला सितारामण यांनी मंगळवारी अर्थसंकल्प जाहीर केला. याबाबत आमदार लांडगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार लांडगे म्हणाले की, काळाच्या ओघात शेती व्यवसयामध्ये बदल होत आहे. शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये तर बदल स्वीकालेला आहे पण अत्याधुनिक सोई-सुविधा पुरवून उत्पादनात देखील वाढ होणे गरजेचे आहे. त्यामुळे परंपारिक साधनांमधून हा विकास साधता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील सेवा पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे, शेती व्यवसयात मोठा बदल होऊन शेतकऱ्यांचे कष्ट तर कमी होणारच आहे पण उत्पादनात देखील वाढ होणार आहे. हरितक्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विद्यापीठे उभारण्यात येणार आहेत. तसेच, पुढील तीन वर्षात तब्बल ४०० वंदे भारत रेल्वे धावणार आहे. वंदे भारत या मोदी सरकारने सुरू केलेल्या अंत्यत अत्याधुनिक रेल्वे गाड्या आहेत. त्यामुळे पुढील तीन वर्षात रेल्वे अधिक मॉडर्न करण्याच्यादृष्टीने केंद्रानं हे पाऊल टाकले मानले जात आहे.
सर्वसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा प्रयत्न…
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देशात सुमारे ८० लाख घरे निर्माण करण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे. नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी खुले व्यासपीठ करण्यात येणार आहे. ‘नारी शक्ती’चे महत्त्व ओळखून, महिला आणि बालकांच्या एकात्मिक विकासासाठी 3 योजना सुरू होणार आहेत. बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी 2 लाख अंगणवाड्यांचा दर्जा वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करीत केंद्र सरकारने देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.