प्रभाग रचना : सत्ताधारी भाजपा किमान १० प्रभागांमध्ये हरकती नोंदवणार !

तीनही मतदार संघात काही प्रभागांत नियमबाह्य तोडफोड

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना हाताशी धरुन प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप केला आहे. प्रभाग रचना भाजपाला पूरक असली, तरी एकूण ४६ पैकी सुमारे १० प्रभागांमध्ये नियमबाह्यपणे तोडफोड केली आहे. याबाबत आम्ही हरकती घेणार असून, राज्य निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालयातही दाद मागणार आहोत, अशी भूमिका भाजपा विधानसभा प्रभारींनी केली आहे.

निवडणूक विभागाने मंगळवारी तीन सदस्यीय प्रभाग रचना प्रसिद्ध केली. त्यानंतर भाजपाच्या आजी –माजी शहराध्यक्षांनी काही प्रभाग वगळता प्रभाग रचना अनुकूल असल्याचे म्हटले आहे. एकूण ४६ पैकी १० प्रभागांमध्ये नियमांचे उलंघन करण्यात आले आहे. भोसरी मतदार संघातील ४ ठिकाणी, पिंपरी मतदार संघात ३ ठिकाणी आणि चिंचवड मतदार संघातील ३ ते ४ ठिकाणी असंवैधानिकपणे प्रभाग रचना केली आहे. ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देणार आहोत, असा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघाचे भाजपा प्रभारी सदाशिव खाडे म्हणाले की, पिंपरी मतदार संघातील काही प्रभाग चुकीच्या पद्धतीने केले आहेत. राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नगरसेवकांना फायदा होईल, अशी रचना केली आहे. याबाबत आम्ही आक्षेप घेणार आहोत. सत्तेचा गैरवापर करुन महाविकास आघाडी नियमबाह्य प्रभाग रचना करीत आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघाचे प्रभारी संतोष कलाटे म्हणाले की, चिंचवडमध्ये भाजपाच्या ‘स्ट्रॉग’ उमेदवारांना त्रास होईल, असा दृष्टीकोण ठेवण्यात आला आहे. काळेवाडी, चिंचवडगाव आदी ठिकाणी प्रभागाच्या सीमा ठरवताना नियमांचे उलंघन केले आहे. एक प्रभाग चार किलोमीटर अंतराचा केला आहे. नगरसेवकांनी लोकांना कसा संपर्क साधायचा? असा प्रश्न आहे. शहरातील अन्य प्रभाग भाजपासाठी अनुकूल आहेत. पण, काही ठिकाणी निश्चितपणाने आम्ही आक्षेप नोंदवणार आहे. सोबतच आम्ही न्यायालयात जाणार आहोत.

भोसरी मतदार संघाचे प्रभारी विजय फुगे म्हणाले की, भोसरी मतदार संघात १७ ते १८ प्रभाग येतात. भोसरी गावातील  ४ प्रभागांमध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर तोडफोड केली. त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला आहे. चऱ्होली आणि परिसराचा लोकसंख्या आणि क्षेत्रफळ पाहाता चऱ्होलीचा स्वतंत्र प्रभाग होवू शकतो. दिघी भोसरीशी संलग्न असल्यामुळे दिघीचे दिघी-भोसरी आणि दिघी- बोपखेल असे भाग होणे अपेक्षीत आहे. पण, केवळ दिघी बोपखेल हा प्रभाग केला असून, दुसरा भाग थेट चऱ्होलीला जोडला आहे. हे नियमाला धरून नाही. मोशीगावठाण, शिवाजीवाडी, गंधर्वनगरी हा प्रभाग आठ किलोमीटरचा प्रवास करुन भोसरीपर्यंत जोडला आहे. भौगोलिकदृष्या नियमबाह्य आणि नागरिकांच्या दृष्टीने हे हिताचे नाही. त्या-त्या गावाचे प्रभाग त्या-त्या गावात झाले पाहिजेत.

भाजपाकडे ‘त्या’ प्रभागांचा योग्य आराखडा…
पिंपरी-चिंचवडमधील ज्या प्रभागांची तोडफोड करण्यात आली आहे. नैसर्गिक सीमा आणि प्रभाग रचनेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. अशा प्रभागांचा योग्य आराखडा भाजपाकडे उपलब्ध आहे. चुकीच्या पद्धतीने झालेल्या प्रभागांबाबत निवडणूक आयोगाकडे हरकती नोंदवणार आहोत. तसेच, राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोगालाही दाद मागणार आहोत. विशेष म्हणजे, ४६ पैकी १० प्रभागांतील हरकतींबाबत उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत, असा इशाराही भाजपाने दिला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.