पुणे : दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागून 3 हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडले आहे. पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाने ही कारवाई वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.3) केली आहे. संतोष पांडुरंग माने (वय-45) असे लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
याप्रकरणी 32 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष माने हे वडगाव मावळ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून यावरुन तक्रारदारावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास संतोष माने करीत आहेत.
तक्रारदार यांना दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी माने याने 10 हजार रुपये लाच मागितली. तडजोडीमध्ये 3 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानुसार पुणे एसीबीने पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी संतोष माने याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी (दि.3) वडगाव मावळ पोलीस ठाण्यात सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 3 हजार रुपये लाच स्विकारताना संतोष माने याला रंगेहाथ पकडले. माने याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पुढील तपास पोलीस उप अधीक्षक शितल घोगरे करीत आहेत.