पुणे : भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना काल (शनिवारी) पुण्यात धक्काबुक्की करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या आवारात शिवसैनिकांकडून सोमय्या यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे काल पुणे महापालिका परिसरात राडा पाहायला मिळाला. दरम्यान, शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्याची काही साथीदार सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. पण त्या ठिकाणी झटपट झाली. दरम्यान, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 7 ते 8 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरीट सोमय्या यांना पुण्यात शिवसेनेकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. या झटापटीत सोमय्या हे पायऱ्यांवर कोसळले. त्यामुळे त्यांना दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान या प्रकारानंतर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्विट करत ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील सोमय्या यांच्या तब्येतीची विचारपूस करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, सोमय्या यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्लाप्रकारानंतर आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 7 ते 8 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 143, 147, 149, 341, 336, 337 या कलमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे