येरवड्यातील बांधकाम मजुरांच्या मृत्युप्रकरणी कष्टकरी जनता आघाडी आक्रमक

बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उद्या पुण्यात होणार आंदोलन

0

पिंपरी : बिल्डरच्या चुकीच्या धोरणामुळे येरवड्यात बांधकाम मजुरांच्या अंगावर लोखंडी जाळी पडली. त्यामध्ये अनेक कामगार मृत्यूमुखी पडले. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांच्या निषेधार्थ कष्टकरी जनता आघाडी आक्रमक झाली आहे. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 7) दुपारी 2 वाजता आंदोलन छेडण्यात येणार आहे. पुण्यातील कामगार पुतळा पासून आंदोलनास सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून आंदोलन करत या प्रकरणातील दोषींचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता साळवे संघटक सदाशिव तळेकर ,  ठेकेदार मजूर पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष राजू साहू, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रंजीत सहा कार्याध्यक्ष मुकेश ठाकूर ,उपाध्यक्ष दिनेश यादव, आदी उपस्थित राहणार आहेत ,

बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, येरवडा येथे इमारतीचे बांधकाम सुरू असताना लोखंडी जाळी कोसळली. त्यामध्ये मोबीद आलम (वय 40) बिहार, तजीब मोहम्मद शाहिद आलम, (वय 17) बिहार, मोहम्मद सोहिल मोहम्मद शेख (वय 22) बिहार, मोहम्मद शमीम (वय 35) बिहार, मजरूम हुसेन, (वय 35) बिहार आदी कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. या घटनेनवरून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  येरवडा येथील घटना संबंधित बिल्डर, इंजिनियर व संबंधित अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळेच झाली आहे.

अनेकदा बांधकाम सुरू असताना कामगारांना सुरक्षा साधने देणे अपेक्षित आहे. मात्र त्याकडे बिल्डर, ठेकेदार दुर्लक्ष करताना दिसतात. लोखंडी सळ्याचे जाळे उभे करताना योग्य खबरदारी घेणे गरजेचे होते. मात्र साहित्य कमी वापरून बिल्डर कडून पैशांची बचत केली जात आहे. त्यामुळे केवळ तात्पुरत्या स्वरूपात सळ्या उभ्या केल्या होत्या. परिणामी सळ्या कामगारांच्या अंगावर कोसळल्या आणि त्यात कामगारांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच दोषी असणाऱ्या बिल्डर, ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. तसेच बांधकाम मजुरांची शासनाच्या नियमानुसार नोंदणी करून कामगार व त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा. संबंधित
येरवडा येथील प्रकरणाबाबत त्वरित कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात येणार आहे.

राजमाता जिजाऊ आणि माता रमाई या आमच्या प्रेरणा आहेत. त्यांनी संघर्ष करत इथल्या व्यवस्थेविरोधात बंड पुकारले. नुकतीच राजमाता जिजाऊ यांची जयंती झाली. सोमवारी (दि. 7) माता रमाई यांची जयंती आहे. त्या निमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून फोटो हातात घेऊन कामगार पुतळा येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे. या मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या बांधकाम मजुरांना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात येणार आहे. त्यामध्ये बांधकाम कामगारांच्या व्यथा मांडणार असल्याचे बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.