पुणे : शहराच्या बिबवेवाडी परिसरात टोळक्याने मध्यरात्री तूफान राडा घालत तरूणांवर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. परंतु तरुणांनी पळ काढल्याने थोडक्यात तो बचावला गेला आहे. या घटनेने मात्र परिसरात रात्रभर तणावाचे वातावरण होते.
याप्रकरणी अमित कैलास थोपटे (वय ३२, रा. बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित थोपटे याचे दत्तवाडी परिसरात सलूनचे दुकान आहे. तो राहण्यास बिबवेवाडीतील शिवशंकर सोसायटी गल्ली क्रमांक दोन येथे आहे. त्याची चार फेब्रुवारी रोजी या आरोपींशी वाद झाले होते. त्यातून हा प्रकार घडल्याचे पोलीस सांगत आहेत.
दरम्यान, तक्रारदार व त्याचा भाऊ तसेच इतर चार ते पाचजण घराच्या खाली थांबले होते. यावेळी दहा ते अकरा जणांचे टोळके येथे आले. हातात कोयते आणि काठ्या घेऊन आलेल्या या टोळक्याने परिसरात दहशत माजविली. त्यानंतर तक्रारदार याच्या दिशेने येऊन ‘तुला खल्लास करतो’, असे म्हणत त्यातील एकाने पिस्तूल बाहेर काढले. त्यामुळे तक्रारदार भीतीपोटी पळाले. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. दोन गोळ्या या आरोपींनी झाडल्या. पण, सुदैवाने गोळी लागली नाही. परंतु, गोळीबाराच्या आवाजाने शांत झालेला परिसर हादरून गेला आणि एकच गोंधळ उडाला. त्यानंतर हे टोळके दहशत माजवत परिसरातून पसार झाले. माहिती मिळताच बिबवेवाडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, तक्रारदाराला टोळके कात्रज चौकात भेटण्यास बोलवत होते. पण, तो गेला नाही. त्यामुळे टोळके इकडे आले आणि त्यांनी गोळीबार करत त्याच्या खूनाचा प्रयत्न केल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.