पुणे : टीईटी परिक्षेत घोटाळा झाल्याची माहिती समोर आल्यांतर संपूर्ण भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पुणे पोलिसांनी यापूर्वी परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांपासून शिक्षण विभागातील काही जणांना ताब्यात घेतले आहे. यानंतर आता आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. पुणे पोलिसांनी टीईटी परिक्षेत झालेल्या घोटाळ्याचा गतीने तपास केला आहे. जे पैसे भरुन शिक्षक झाले आहेत अशा शिक्षकांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. त्यामुळे राज्यातील 7800 बोगस शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
शिक्षण परिषदेच्या आयुक्तापासून अनेक गैरप्रकारात समावेश असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रकरणात 7 हजार 800 अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याचं समोर आलं होतं. अपात्र उमेदवारांकडून प्रत्येकी 1 ते अडीच लाख रुपये घेऊन त्यांना प्रमाणपत्र दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. यानंतर आता संबंधित बोगस शिक्षकांची यादी तयार करण्यात आली आहे.
2019-20 मध्ये झालेल्या टीईटी परिक्षेत गैरव्यवहाराचा पुणे सायबर पोलिसाकडून तपास केला जात आहे या परिक्षेच्या निकालातील अंतिम 16 हजार 705 पात्र परीक्षार्थ्यांचे कंपनीकडील डाटासंबंधी तांत्रिक विश्लेषण आणि आरोपींकडून मिळालेल्या डिजिटल पुरावा यांचा एकत्रित तपास करण्यात येत आहे.
तसेच परीक्षार्थींचे ओएमआर शिटस याचा तपास करुन एकूण 7880 अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी त्यांच्या मुळ गुणांमध्ये वाढ करुन त्यांना पात्र केल्याचे समोर आले. या परीक्षार्थींची संख्या आणखी वाढ होवू शकते, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी (दि.28) पत्रकारांना दिली होती.