देहूगाव : तीर्थक्षेत्र देहूगावच्या प्रथम नगराध्यक्षपदी स्मिता चव्हाण यांची तर उपनगराध्यक्षपदी रसिका स्वप्नील काळोखे यांची बिनविरोध निवड झालेली आहे.
देहू नगरपंचायतीची पहिली निवडणूक १४ राष्ट्रवादी, एक भाजप आणि दोन अपक्ष अशी झाली. दोन्ही अपक्षांनी निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी १६ भाजपचा एक असे पक्षीय बलाबल होते.
त्यामुळे राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होणार हे निश्चित होते. हे नगराध्यक्ष पद ठरल्याप्रमाणे स्मिता शैलेश चव्हाण यांना मिळाले.
पुण्याचे प्रांत अधिकारी संजय असवले यांनी पीठासीन अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. पाच दहा मिनिटे बंद खोलीत खलबते झाली. अवघ्या पाच मिनिटात नगराध्यक्षपद घोषित केले.
उपनगराध्यक्ष पदासाठी सकाळी ११.२९ मिनीटांनी रसिका स्वप्नील काळोखे या कार्यालयात आल्या. उपनगराध्यक्ष पदाचा फॉर्म मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्या स्वाधीन केला. एकमेव अर्ज आल्याने त्यांनाही बिनविरोध घोषित करण्यात आले. निवडीनंतर ढोल-ताशांच्या गजरात दोघींची मिरवणूक काढण्यात आली होती.