उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आभाराचे फलक भाजपच्या नगरसेवकाने शहरात झळकवले

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या
निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. आज सकाळीच भोसरी येथील भाजपा नगरसवेकाने स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन पक्षाला जोरात धक्का दिला आहे. हे झटका ताजा असताना चिंचवड विधानसभा मतदार संघातील भाजपा नगरसेवकांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आभाराचे शहरात ‘फलक’ झळकवले.

बोगस एफडीआरव्दारे अनेक ठेकेदारांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. रस्ते व गटार सफाईचे पन्नास कोटी रुपयांचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराने त्यापोटी दिलेली सहा कोटी नव्वद लाख ७१ हजार रुपयांची बॅंक गॅरंटी बोगस निघाली. मात्र, महापालिका आयुक्त हे संबंधित ठेकेदारवर कारवाई करत नव्हते. याबाबत भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून संपुर्ण गा-हाणे मांडले. त्यावर आयुक्तांना तत्काळ दोषीवर कारवाई करायला सांगितले.  त्यामुळे पालिकेने या कंत्राटदाराविरुद्ध पोलिसांत फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल केला. यावरच भाजप नगरसेवकाने पिंपरी-चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे फ्लेक्स लावून जाहीर आभार मानले आहेत.

बोगस एफडीआर देणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध पिंपरी पालिकेने फौजदारी दाखल केली आहे. त्यातील आठ जणांना काळ्या यादीतही टाकले आहे. या बोगस ठेकेदारांच्या यादीत नव्याने भर पडलेला कंत्राटदार हा पुण्यातील रविराज चंद्रकांत लायगुडे असं नाव आहे.

लायगुडेने सिक्युअर आय़टी फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. या आपल्या कंपनीव्दारे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ व ब प्रभागातील गटारे व सफाईचा आरोग्य विभागाचा ठेका घेतला होता. त्यापोटी त्याने दिलेली मुंबई येथील स्टेट बॅंकेची सात कोटींची गॅरंटी बनावट निघाली. त्यामुळे या विभागातील लेखापाल आनंद गायकवाड (५५,रा.पुणे) यांनी त्याबाबत दोन दिवसांपूर्वी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावर आज गुन्हा दाखल झाला.

या ठेकेदाराने बोगस बॅक गॅंरटीच नाही, इंदापूरमधील गटारे व रस्त्यांची साफसफाई केल्याच्या कामाचे अनुभवाचे इंदापूर नगरपरिषदेचे खोटे प्रमाणपत्रही सादर केले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्धच्या गुन्ह्यात फसवणुकीसह बनावद दस्ताऐवज बनवल्याचे कलमही लावण्यात आले आहे.

या बोगस कागदपत्राव्दांरे त्याने हे काम मिळवल्याचा गौप्यस्फोट पालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी कागदपत्रांसहित २४ डिसेंबरच्या पालिका सभेत केला होता. तो करू नये म्हणून त्यांना धमकावण्यातही आले होते.

या फसवणुकीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, पालिका प्रशासनाकडून कारवाई न झाल्याने त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाच पत्र देत कारवाईची मागणी केली. तसेच त्यांची भेट देखील घेतली होती. त्यावर पवारांनी पालिका आयुक्त राजेश पाटील व पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बैठक घेत यात चुकीचे काम झाले असेल,तर कारवाई करा,असा आदेश दिला. त्यानंतर सूत्रे हालली. पालिकेकडून तक्रार दाखल झाली आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.