पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2022-23 या आर्थिक वर्षांचा मूळ 4 हजार 961 कोटी 65 लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 497 कोटी 2 लाख रुपयांचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आज (शुक्रवारी) स्थायी समितीला सादर केला. निवडणूक असल्याने कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आलेली नाही. निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून या रणधुमाळीतच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.
सभापती नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या ऑनलाइन विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेचा हा 40 वा अर्थसंकल्प आहे. तर, आयुक्त राजेश पाटील यांचा दुसरा अर्थसंकल्प असला तरी मागीलवर्षी त्यांनी केवळ अर्थसंकल्प सादर करण्याचे काम केले.
कारण, तत्कालीन आयुक्तांनी अर्थसंकल्प तयार केला होता. त्यामुळे आयुक्त पाटील यांचा पहिला अर्थसंकल्प होता. पण, अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आयुक्तच गैरहजर होते. महापालिका इतिहास पहिल्यांदाच आयुक्त अर्थसंकल्पाला गैरहजर राहिले आहेत. अर्थसंकल्पाच्या अभ्यासाठी ही विशेष सभा 23 फेब्रुवारी पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.