मोठी बातमी : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर चिंचवड मतदार संघाची जबाबदारी!

आगामी महापालिका निवडणुकीत घालणार लक्ष

0

पिंपरी : मावळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे पक्षाने आता खडकवासला, कर्जत आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

भाजपाचे माजी मंत्री बाळा भेगडे यांचा पराभव करुन २०१९ मध्ये सुनील शेळके यांनी विधानसभा सभागृहात एन्ट्री केली आहे. त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शेळके यांनी राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले आहे. त्यामुळे आमदार शेळके यांना आता चिंचवड मतदार संघाची जबाबदारी सोपवली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसे पत्र जारी केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या चिंचवड मतदार संघात आता आमदार शेळके लक्ष घालणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘गुड बॉक्स’मधील आमदार अशी शेळके यांची ओळख आहे.

आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती इ. निवडणुकांच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत २०२४ मध्ये पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा, या दृष्टीने काम करावे, अशी सूचना आमदार शेळके यांना करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आमदार शेळके यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.