मुंबई : एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.कारण वानखेडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वयाची जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन हॉटेलचा परवाना घेतल्याच्या प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाने वानखेडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी २ फेब्रुवारी रोजी समीर वानखेडे यांच्या मालकीच्या सद्गुरू बार आणि रेस्तराँचा परवाना रद्द केला होता. समीर वानखेडे यांच्याविरोधात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी तक्रार दाखल केली होती. नवी मुंबई वाशी येथून गुन्हा वर्ग केल्यानंतर कोपरी पोलिस ठाण्यात कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोगावले यांनी शनिवारी रात्री ८ च्या सुमारास कोपरी पोलिस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली. समीर वानखेडे यांनी खोटी माहिती दिली आणि खोट्या माहितीच्या आधारे मद्य विक्रीचा परवाना मिळवला, अशी माहिती गोगावले यांनी तक्रारीत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. वानखेडेंनी आपले वय चुकीचे दाखवल्याचा ठपका ठेवत हा परवाना रद्द करण्यात आला होता. समीर वानखेडेंच्या नावावर नवी मुंबईतील वाशीमध्ये एक बार आहे.
उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या बारसाठी २७ ऑक्टोबर १९९७ रोजी परवाना दिला होता. या बारचे लायसन ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे. यावरूनच नवाब मलिकांनी वानखेडेंवर आरोप केले होते. हे बार आणि रेस्टॉरंट आहे.
वयाच्या १७ व्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर वानखेडेंवर ही कारवाई करण्यात आली. वाशी येथील सद्गुरु हॉटेल्सच्या लायसन्समध्ये वयाचा पुरावा नसल्याने त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.