पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊत विरुद्ध भाजप असा सामना रंगताना पहायला मिळत आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी केलेल्या आपल्या वक्तव्याचा पुन्हा:उल्लेख करत संजय राऊत शरद पवारांसाठी काम करत असल्याची टीका केली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना थेट मुख्यमंत्री पदावर बसवता येणार नसल्याने संजय राऊतांना मुख्यमंत्री पदापर्यंत नेण्यासाठीचा राष्ट्रवादीचा अजेंडा असल्याचं आपल्याला वाटतं असे चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना सांगितलं.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख मित्र असा केला. काहीही झालं तरी उद्धवजी आमचे मित्र आहेत. ते मानोत किंवा न मानोत काहीही झालं तरी एकतर्फी मैत्री आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते चिरंजीव आहेत. अनेक वर्षे आम्ही एकत्र काम केलंय. कोण संजय राऊत ओ? काल परवा आले शिवसेनेत आणि ते कोणाला शिकवतात? असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.
आम्ही उद्धवजींना एवढं म्हटलं की आम्हाला जे आकलन आहे त्यानुसार संजय राऊत पवारसाहेबांनी दिलेल्या अजेंड्यावर काम करत आहेत. जो अजेंडा तुम्हाला अडीच वर्ष होत आल्याने मुख्यमंत्री पदावरुन घालवणे. डायरेक्ट सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करु शकत नाहीत, ते हे सगळं मान्य करणार नाही. संजय राऊत (मुख्यमंत्री) झाले तरी त्यांना सुप्रियाताई झाल्यासारखं आहे. मातोश्रीचा पाया उखडण्याचं काम चाललेलं आहे, असे मला वाटते म्हणून मी बोललो, आता माझ्या म्हणण्यावर बंदी आणणार का? असा सवालही पाटील यांनी केला.