मुंबई : मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर हल्लाबोल करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांना आव्हान दिले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्या कुटुंबीयांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर बोलताना किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई करु शकणार नाहीत, असे वक्तव्य केले आहे.
‘बाप बेटे जेल जाएंगे’ असे म्हणत संजय राऊतांनी किरीट आणि नील सोमय्या यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरु केली आहे. यानंतर नील सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. याच मुद्यावर बोलताना किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
किरीट सोमय्या म्हणाले, राज्यातील जनतेला काल कळलं की, नील सोमय्या निर्दोष आहे. त्यांना मुंबई पोलिसांनी दोषी ठरवले नाही, त्यामुळे त्यांची बदली केली. संजय राऊत तुम्ही नौटंकीबाज आहात हे कबूल करा. कसला गेम बिन. ईडीने बंदूक दाखवली तो डेकोरेटर कुठे आहे ? असा सवाल त्यांनी केला. पेड मीडिया एजन्सी सल्ला देत आहे. मोदी सरकार मागे लागलंय असं दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मग पोलीस कमिश्नरची हकालपट्टी का केली ते सांगा, असेही सोमय्या म्हणाले.
उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी किरीट सोमय्यांवर कारवाई करु शकणार नाहीत. मेधा सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर कारवाई करु शकणार नाहीत. कारण घोटाळे उद्धव ठाकरे करतात. जे डर्टी डझन घोषित केले आहेत, त्यांच्यावर कारवाई कधी होणार ते सांगा, असे म्हणत श्रीधर पाटणकर यांनी हवाला ऑपरेटरकडून पैसा ट्रान्सफर केला, वरुण सरदेसाईचेही पुरावे समोर येत असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.