पेट्रोल पंपावर केला 66 लाखांचा अपहार; दोघांवर गुन्हा दाखल

0

पिंपरी : मॅनेजर पदावर काम करत असलेल्या दोघांनी पेट्रोल पंपाच्या टॅंकमधून टेस्टिंगसाठी काढलेल्या पेट्रोल व डिझेलची चोरी केली. तसेच बोगस ग्राहकांच्या नावे खाते बुक तयार करून त्याचा वापर करून पेट्रोल पंपावरून रोख रक्कम घेतली. यात पेट्रोल पंपाच्या मालकाची एकूण 66 लाख 57 हजार 398 रुपयांची फसवणूक केली. एप्रिल 2019 ते एप्रिल 2021 या दोन वर्षांच्या कालावधीत समर्थ सर्विस स्टेशन, हिंजवडी येथे हा प्रकार घडला.

प्रवीण संपत पवार, संतोष बाबाजी आरण (रा. थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मोहिनी महेश सोंडेकर (40, रा. संत नगर, मोशी प्रधिकरण) यांनी बुधवारी (दि. 2) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा हिंजवडी येथे हिंजवडी -वाकड रस्त्यावर समर्थ सर्विस स्टेशन हा पेट्रोल पंप आहे. आरोपी हे या पेट्रोल पंपावर मॅनेजर होते. आरोपींनी संगणमत करून फिर्यादी यांना कोणतीही माहिती न देता त्यांच्या परस्पर अंडरग्राउंड टॅंकमधील पेट्रोल व डिझेल टेस्टिंग साठी काढले. टेस्टिंग झाल्यानंतर ते पुन्हा टॅंकमध्ये न टाकता त्याची चोरी करून परस्पर दुसरीकडे विक्री केली.

तसेच बोगस ग्राहकांच्या नावे खाते बुक तयार केले. त्यावर त्यांचे खोटे शिक्के मारून रिसीट पंपावरील कर्मचारी गणेश बनसोडे आणि नवनाथ साठे यांना देऊन त्यांच्याकडून पंपावरील रोख रक्कम स्वीकारली. दोन वर्ष हा प्रकार सुरु होता. या कालावधीत आरोपींनी फिर्यादीची एकूण 66 लाख 57 हजार 398 रुपयांची फसवणूक केली. आरोपींनी त्या पैशांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.