मुंबई : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुक्ला यांच्या विरोधात टेलिग्राफ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
दरम्यान आजच (शुक्रवार) मुंबई उच्च न्यायालयाकडून शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. 25 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहे. फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी शुक्ला यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह विविध राजकीय पक्षांमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅपिंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा पुणे पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे मंत्र्यांची संभाषणं रेकॉर्ड केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही शुक्लांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केलं. यानंतर अटक टाळण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळावलं आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय राज्य मंत्री बच्चू कडू, आशिष देशमुख व संजय काकडे यांचे तब्बल 60 दिवस फोन टॅप केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.