मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्टिंग ऑपरेशनचं पेन ड्राईव्ह सादर करुन एकच खळबळ उडवून दिली. फडणवीस यांनी केलेल्या गंभीर आरोपांची राज्य सरकारने दखल घेत या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलावून घेतले होते. या बैठकीमध्ये सुषमा चव्हाण यांनी सर्व कागदपत्रे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सादर केल्याची माहिती समोर येत आहे.
भाजप आमदार गिरीश महाजन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केल्यानंतर तपास अधिकारी सुषमा चव्हाण या पुण्यातून थेट मुंबईमध्ये दाखल झाल्या आहेत. आज सकाळी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली आणि संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर सुषमा चव्हाण आणि संजय पांडे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी सुषमा चव्हाण यांनी आपल्यासोबत आणलेली कागदपत्र गृहमंत्र्यांकडे सुपूर्द केली. त्यांनी ही सर्व कागदपत्रे पुणे कार्यालयातून आणली होती.
दरम्यान, बैठकीपूर्वी दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काल सभागृहात विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर आज उत्तर देणार होतो.
त्यासाठी तयार होतो. मात्र त्यांनी मागणी केली होती की, उद्या चर्चा व्हावी. त्यामुळे मी उद्या यावर उत्तर देईल. त्यांनी खरेतर कायदा सुव्यवस्था यावर बोलायचे होते. परंतु ते त्यांच्या कर्तव्यापासून दूर गेले. उद्या माझ्या उत्तरानंतर दुध का दुध पानी का पानी होईल, ‘करारा जबाब मिलेगा’ असे म्हणत त्यांनी भाजपला इशारा दिला.