राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी बनावट ‘रेकॉर्ड’ तयार करणाऱ्या पुणे पोलिस दलातील तीन पोलिसांवर गुन्हा दाखल

0

पुणे : पोलीस दलात राष्ट्रपती पदक मिळविणे ही खूप मोठी कामगिरी समजली जाते. त्यासाठी तुमचे रेकॉर्ड नि:ष्कलंक असणे महत्वाचे असते. त्याशिवाय तुम्हाला कोणतीही शिक्षा झालेली नसावी, ही प्रमुख अट असते. एका पोलीस हवालदाराने आपल्याला राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी पोलीस उपायुक्त कार्यालयातील लिपिकांना हाताशी धरुन चक्क बनावट रेकॉर्ड तयार करुन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी या हवालदारासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवा पुस्तकातील शिक्षा लागलेले पान फाडून दुसरे पान चिटकविले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हवालदार गणेश अशोक जगताप (नेमणूक – विशेष शाखा), कनिष्ठ श्रेणी लिपिक नितेश अरविंद आयनूर (पोलीस उपायुक्त कार्यालयातील गोपनीय शाखा), वरिष्ठ श्रेणी लिपिक रवींद्र धोंडिबा बांदल (सध्या पोलीस आयुक्त कार्यालय) तसेच वानवडी पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये नेमणुकीस असलेले डे बुक अंमलदार व गणेश अशोक जगताप यांचे साथीदार अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी वरिष्ठ लिपिक संतोष प्रतापराव भोसले यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ यांच्या कार्यालयात २६ जुलै २०१७ ते २९ जानेवारी २०२० दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार गणेश जगताप हे २०१७ ते २०२० या कालावधीत वानवडी पोलीस ठाण्यात नेमणूकीस होते. त्यांना कामात कसूर केल्याबद्दल २ वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा झाली होती. ही शिक्षा १३ फेब्रुवारी २०१८ रोजी देण्यात आली होती. राष्ट्रपती पदक मिळविण्यात ही शिक्षा आड येत होती. त्यामुळे त्याने कार्यालयातील गोपनीय शाखेतील कनिष्ठ श्रेणी लिपिक नितेश आयनूर तसेच वरिष्ठ श्रेणी लिपिक रवींद्र बांदल यांच्या मदतीने गुन्हेगारी कट करुन सेवा पुस्तकातील नोंदीचे बनावटीकरण करुन, खोटा दस्त तयार केला. त्यावर बनावट सह्या करुन, सरकारी शिक्यांचा गैरवापर करुन ही २ वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा झाली असताना त्याबाबतचे दस्तऐवज व रेकॉर्ड नष्ट करुन घेऊन गणेश जगताप याने स्वत:चा बेकायदेशीर फायदा करुन घेतला.

जगताप याला १३ फेब्रुवारी २०१८ रोजी शिक्षा देण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वानवडी पोलीस ठाण्यात नेमणूकीला असलेले डे बुक अंमलदारांची होती. त्यांनी या शिक्षेची अंमलबजावणी न करता जगताप याला मदत केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपती पदकासाठी आपली कामगिरी योग्य आहे, असे वाटल्यास प्रत्येक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वरिष्ठांकडे अर्ज करु शकतो. त्यानुसार, गणेश जगताप गेले काही वर्षे अर्ज करीत होता. त्यात आपल्याला कोणतीही शिक्षा झालेली नाही अथवा चौकशी प्रलंबित याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. जगताप याने राष्ट्रपती पदकासाठी अर्ज केला होता. त्याची चौकशी करत असताना त्याच्या सेवा पुस्तकात दुसरे पान जोडलेले आढळून आले. त्यानंतर गणेश जगताप आणि त्याला मदत करणारे लिपिक, डे बुक अंमलदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.