पुणे : कोट्यावधी रूपयांच्या क्रिप्टो करन्सीची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी पुण्यातील दोन सायबर तज्ञांना याप्रकरणी अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मोबाईल, मॅकबुक, हार्ड डिस्क, टॅब, लॅपटॉप, सिडी आणि इतर ऐवज जप्त केला आहे. दरम्यान, न्यायालयाने दोघांना दि. 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पंकज प्रकाश घोडे (38, रा. ताडीवाला रोड, पुणे) आणि रविंद्रनाथ प्रभाकर पाटील (45, रा. बिबवेवाडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सायबर पोलिसांनी पंकज घोडे याच्याकडून 3 मोबाईल, 2 मॅकबुक, 3 हार्ड डिस्क, 2 टॅब, 2 लॅपटॉप, 4 सिडी, 6 पेन्ड्राईव्ह, 2 मेमरी कार्ड, 3 स्मार्ट वॉच, 21 एटीएम कार्ड, 1 पेनड्राईव्ह कार्ड, 2 ओळखपत्र, 7 व्हिजीटींग कार्ड, 2 पास, 2 चेकबुक, 2 पासबुक, 1 आयपॅड, 1 सिमकार्ड, 2 पासपोर्ट, 1 चार्जर, डब्ल्यूडीसी कंपनीची कागदपत्रे व तपास मदत पत्र, 8 डायर्या, 1 नोटपॅड शिट आणि 1 राऊटर जप्त केला आहे. तर रविंद्रनाथ पाटील याच्याकडून 4 लॅपटॉप, 12 मोबाईल, 11 पेनड्राईव्ह, ए – 4 साईज पेपर, 1 आयपॅड, 2 टॅब, 1 हॉटस्पॉट डिवहाईस, 2 इंटरनेट राऊटर, 1 इंटरनेट डोंगल, 6 हार्डडिस्क, 9 वेगवेगळ्या रंगाच्या डायर्या, 4 डीव्हीडी, 3 सीडी, ट्रेझर वॉलेट, मेमरी कार्ड आणि 1 संगणक संच जप्त केला आहे.
हा गुन्हा एप्रिल 2018 ते आजपर्यंत सायबर पोलिस स्टेशन पुणे शहर आणि आरोपींच्या इतर अन्य ठिकाणी ऑनलाइन घडला आहे. पंकज घोडे आणि रविंद्रनाथ पाटील यांनी त्यांना दत्तवाडी पोलिस स्टेशन आणि निगडी येथे सन 2018 मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या तपासाकरिता तांत्रिक तज्ञ म्हणून पोलिसांना सहाय्य करत होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे तपासी अधिकारी व पोलिसांनी विश्वासाने सुपुर्त केलेल्या डेटाचा अप्रामाणिकपणे वापर करून तसेच विश्वासघात करून गैर हेतुने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी उपयोग केला. तांत्रिक अहवालामध्ये बनावटीकरण करून शासनाची व गुंतवणुकदाराची कोट्यावधी रूपयांची क्रिप्टो करन्सी घेवून फसवणूक केली आहे.
आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडून अनेक महत्वाच्या गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, सायबर उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहाय्यक आयुक्त विजयकुमार पळसुले, व. पो. नि. डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण, पो. नि. मिनल सुपे – पाटील, सायबर पोलिस ठाण्यातील राजुरकर, खेडकर, कोळी, भोसले, भापकर, नलावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक वाळके, उपनिरीक्षक नेमाणे, डफळ, पडवळ आणि 27 पोलिस अंमलदार तसेच न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळेतील अधिकारी तज्ञ तेजस कट्टे, तनुजा सुर्यराव, राहूल कनोज व श्रीमती गायकवाड यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे.
आरोपींना अटक केल्यानंतर विशेष जिल्हा न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.
पोलिसांनी सखोल तपासासाठी आरोपींच्या 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. सरकारी वकिल मारूती वाडेकर यांनी जोरदार युक्तीवाद केला.
न्यायालयाने आरोपींना 7 दिवस म्हणजेच दि. 19 मार्च 2022 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.