पिंपरी : मोशी परिसरात गुरुवारी सकाळी केमिकलचा बॅरल स्वच्छ करीत असताना स्फोट झाल्याने आठ जण जखमी झाले.
मुसा मोहम्मद, शिवराज बोईगवाड, महादू पाडुळे, सुरेश बोईगवाड, पिराज बोईगवाड, मल्लू बोईगवाड, माधव बोईगवाड, बालाजी बोईगवाड अशी भाजल्यामुळे जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
अग्निशामक दलाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी मोशी येथील डी मार्ट समोर असलेल्या भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची वर्दी विकिस नाईक यांनी दिली. तसेच काही जण अडकले असल्याचेही त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशामक केंद्रातील तसेच चिखली अग्निशामक उपकेंद्रातील प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाले.
केमिकलचे बॅरल स्वच्छ करत असताना हा स्फोट झाला. यातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या गोदामामध्ये ग्राउंड आणि पहिला मजला होता. केमिकलचे बॅरल स्वच्छ करण्याचे काम ग्राउंड फ्लोअरला चालत होते. तसेच पहिल्या मजल्यावर गोदामामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी पाच खोल्या तयार करण्यात आल्या आहेत.