पुणे : पुणे शहराच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात अमली पदार्थांचे तस्कर व कुविख्यात गुन्हेगारांच्या नावावर राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासाला सुरवात झाली आहे. सोमवारी याप्रकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची दिवसभर चौकशी करण्यात आली आहे. तर, याआधी संबंधित अधिकाऱ्यांचे व कर्मचारी जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
काँग्रेसचे नेते नाना पटोले, आमदार बच्चू कडू, आशिष देशमुख व संजय काकडे यांचे मोबाईल टॅपिंग केले गेले होते. 2015 ते 2019 या कालावधीत हे फोन टॅप केले गेले होते. उच्चस्थरिय समितीच्या अहवालानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलीसांनी तत्कालीन गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची आज दिवसभर चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे विचारपूस केली गेली आहे. गरज भासल्यास आणखी बोलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, यापुर्वी या विभागात असणाऱ्या तत्कालीन कर्मचारी आणि एका प्रभारी अधिकाऱ्याचा जबाब नोंदविण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. एकूण चार व्यक्तींचे जबाब यात नोंदविण्यात आले आहेत. त्यानुसार, पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.