सायबर तज्ज्ञ पंकज घोडे आणि माजी IPS अधिकारी पाटील यांच्याकडून सहा कोटींचे क्रिप्टोकरन्सी जप्त

0

पुणे : बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या अभासी चलन फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सायबर तज्ज्ञांसह माजी आयपीएस अधिकाऱ्याकडून पोलीस कोठडी तपासात पुणे सायबर पोलिसांनी सहा कोटी रुपयांचे विविध क्रिप्टोकरन्सी जप्त केली आहे. फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. सायबर तज्ज्ञ पंकज प्रकाश घोडे (38 रा. ताडीवाला रस्ता) आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील (45 रा. बिबवेवाडी) यांना बिटकॉईन प्रकरणात पोलिसांना तांत्रिक मदत करण्यासाठी नेमले होते.

मात्र या दोघांनी गोपनीयतेचा भंग करुन गैरमार्गाने आरोपींच्या खात्यातील बीटकॉईन त्यांच्या खात्यावर वर्ग केल्याचे उघडकीस आले होते. त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी (दि.25) न्यायालयात हजर करण्यात आले होते.

न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर रवींद्रनाथ पाटील यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. तर पाटील यांची पत्नी कांचन पाटील आणि भाऊ अमरनाथ पाटील यांनीही सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर सोमवारी (दि.28) सुनावणी होणार आहे. पाटील यांनी मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सी स्वत: व त्याच्याशी इतर संबंधित व्यक्तीच्या वॉलेटवर घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून चालू बाजारभावाप्रमाणे सहा कोटी रुपये किमतीचे विविध क्रिप्टोकरन्सी जप्त केले आहे.

तसेच आणखी क्रिप्टोकरन्सी जप्त करण्याचे काम सुरु आहे. याशिवाय आरोपींनी अपहार करुन त्यातून कमावलेल्या मालमत्तेचा शोध घेऊन ते जप्त करण्यात येत आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपींविरुद्ध सक्षम पुरावे गोळा करुन न्यायालयात वेळेत दोषारोपत्र दाखल करायचे असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण करत आहेत.

फसवणूक प्रकरणातील आरोपी अमित भारद्वाज व विवेककुमार भारद्वाज या दोघा भावांनी पुण्यासह देशभरातील सुमारे साडेचारशे लोकांची बिटकॉईनमध्ये फसवणूक केली होती. जगभर गाजलेल्या या प्रकरणात पहिला गुन्हा दत्तवाडी व निगडीमध्ये दाखल झाला होता. पुणे पोलिसांनी त्यात दोघांना अटक केल्यानंतर देशभरात त्यांच्याविरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिसांनी या प्रकरणात एकूण 17 जणांना अटक केली होती. बिटकॉईनबाबत फारशी माहिती नसल्याने पोलिसांनी सायबर तज्ञ पंकज प्रकाश घोडे व तत्कालीन आयपीएस अधिकारी रविंद्र प्रभाकर पाटील यांची मदत घेतली. पण, पोलिसांनी विश्वासाने दिलेल्या तांत्रिक माहितीचा दुरोपयोग करुन या मार्गदर्शकांनीच पोलिसांची फसवणूक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.