पिंपरी : निवडणुका वैचारिक आधारवर लढवल्या जातात. भारतीय जनता पार्टी विचार आणि नैतिकता जपत मजबूत संघटन म्हणून मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे मतदारांची भाजपाला पसंती आहे, असे मत डॉ. सतीश पुनियांजी यांनी व्यक्त केले.
नेहरूनगर उद्यमनगर येथील रंजनाज बॅक्वेट हॉल येथे पिंपरी चिंचवड शहर राजस्थान प्रवासी जनतेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
राजस्थानचे भाजपा प्रदेश अध्यक्ष डॉ. सतीश पुनियांजी, पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भावेन पाठक, संजय मंगोडेकर, पिंपरी चिंचवड शहर अल्पसंख्यांकचे अध्यक्ष फारुक इनामदार, अर्जुन ठाकरे, तुषार वाघेरे, परीक्षित वाघेरे, भगवान शिंदे, ऍड. रुपाली वाघेरे, यांच्यासह राजस्थानी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सतीश पुनियांजी म्हणाले, निवडणुका कोणताही असला तरी संघटन म्हणून भाजपाकडून त्या लढविल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप हे दोघेही वीरतेचे प्रतीक आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्र आणि राजस्थान भक्ती शक्तीच्या भूमी म्हणून ओळखले जातात. शरद पवार यांना कुठल्याही गटाचा अध्यक्ष केले तरी त्याचा भाजपावर परिणाम होणार नाही. कारण भाजप एक मजबूत संघटन असलेला पक्ष आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. महापालिका निवडणुकांमध्ये शहरातील राजस्थानी बांधव भाजपा सोबतच राहतील.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, राजस्थान सह विविध राज्यातून आलेल्या नागरिकांना पिंपरी चिंचवड शहरामध्ये सन्मान मिळतो. राजस्थान जरी त्यांची जन्मभूमी असली तरी पिंपरी चिंचवड ही कर्मभूमी आहे. राजस्थानी नागरीक या शहरात संस्कृती आणि परंपरा जपण्याचे काम करतात. त्यांच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार लांडगे म्हणाले.
या प्रसंगी राजस्थानी बांधवांनी डॉ. सतिश पूनियांजी यांचा पुणेरी पगडी घालून सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मंगोडेकर यांनी केले. आभार कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भावेन पाठक यांनी केले.