गोव्यानंतर कोल्हापूरला पिंपरी चिंचवडची रसद

फेणीची झिंग चढणार की तांबड्याचा ठसका लागणार

0

पिंपरी (रोहित आठवले) : गोव्याच्या फेणीची राजकीय चव पांचट करण्याचा डाव उधळवून लावल्यावर तांबडा पांढऱ्याचा रंग टिकविण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजपाची टीम सज्य झाली आहे.

गोवा राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये पिंपरी चिंचवड मधून एक पैलवान आमदार आणि त्यांची टीम पाठवत भाजपाने काही मतदारसंघ काबीज केले. आता कोल्हापुरात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत पिंपरी चिंचवड मधील निष्ठावान कार्यकर्ते कोल्हापूरला निघाले असून, त्याचा निकाल तांबडा लागतो की पांढरा हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

गोवा आणि कोल्हापूर दोघेही आपली स्वतंत्र ओळख आजही टिकवून आहेत. त्यामुळे गोव्या प्रमाणे समीकरण बदलण्यात ही रसद किती कामी येते याबाबत दोन्ही उमेदवार स्वतःच शाशंक आहेत.

गोव्यातील फेणी आणि कोल्हापुरातील तांबडा-पांढरा हे समीकरण बदलणे भल्याभल्यांना जमलेले नाही. त्यातच सेफ झोन म्हणून प्रदेशाध्यक्ष वामकुक्षीसाठी कोथरूडमध्ये आले. पण त्यांना “मी प्रदेशाध्यक्ष आहे हे पटवून देण्यासाठी बोल्हाई आणि बोकड हा वाद बाजूला सारत कोल्हापुरात परतावं लागले आहे.” त्यांच्या जोडीला पिंपरी चिंचवड मधून एक टीम निघाली असून, महाविकास आघाडीचा खिमा करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

गोव्यात म्हापसा विधानसभा काबीज करण्याचे थोडे का होईना श्रेय भाजप आमदार महेश लांडगे यांना द्यावे लागेल. त्यांनी भोसरी विधानसभा मतदार संघात मामांना घातलेल्या “राजकीय टोपी”चा अनुभव गोव्यात कामाला आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभागाऐवढ्या लोकसंख्येचा गोव्यातील एक-एक विधानसभा मतदार संघ होता. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीत सत्ता आणताना झालेली कुस्ती हेरून देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात पिंपरी चिंचवड ची टीम वापरली..

आता कोल्हापुरातून वामकुक्षीकरीता पुणेकर झालेल्यांना तांबड्याचा ठसका लागू नये म्हणून पिंपरी चिंचवडची रसद पुरविली जात आहे. पण या रसदेला प्रतिक्रिया रां..ॆच्या अशी सुरू झाल्यास निकालाच्या कुस्तीचा डाव उलटू शकतो यात शंका नाही.

पुणे सेफ झोन करून देणारेही पुढील दहा दिवसांसाठी कोल्हापुरातील वामकुक्षीसाठी दक्ष झालेत. कोणत्या तिकटी वर सतरंजी अंथरता येऊ शकते याची चाचपणी झाल्यावर साडेतीन मुहुर्तावर वेस ओलांडून ही मंडळी मोहिमेवर निघाली आहे.

पुण्या पिंपरीत कोल्हापुरी मिसळ म्हणून अनेकांनी दही वाटीचे आत्तापर्यंत एक्स्ट्रा पैसे लावले.. त्यापुढे जाऊन हे कसे आमच्या चवीचे आहे, याचे मार्केटिंग अनेक कट्टा चालकांनी आजपर्यंत केले. मात्र, “कोल्हापुरात आळणी म्हणजे आळणीच अन् तांबडा म्हणजे तांबडाच” हे समीकरण चालते. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडची टीम कोल्हापुरात किती भाकऱ्या चुरते, हे निकालावेळी ज्योतिबाचा भंडारा उधळल्यावरच स्पष्ट होणार आहे.

टीमच्या कथित चर्चित नियोजनानुसार, महालक्ष्मी आणि ज्योतिबाच्या दर्शनानंतर ही टीम रंकाळ्यावर आल्हाददायक कोल्हापूर अनुभवणार आहे. पुढे मार्केटमधून चप्पल घेतल्यावर मिरजकर तिकटीवर बिनखांबी जवळ असलेल्या अप्पाकडे जाऊन माव्याच्या प्रत्येकी दोन-चार पुड्या बांधून घेणार आहेत. उन्हाळा असल्याने भाजकी सुपारी साधळू नये म्हणून केडर कडून देण्यात आलेल्या एसी रूममध्ये फ्रिजची व्यवस्था लावण्यास सांगण्यात आल्याचंही समजते.

यातून वेळ झालाच तर भाजप कसा कोल्हापूरकरांसाठी वेळोवेळी कामाला आला हे पटवून दिले जाणार आहे. गृहराज्यमंत्री पद कायम कोल्हापुरात येऊनही कायदा सुव्यवस्था खरंच या लोकांना राखता आली नाही हेही बिंबविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण कोल्हापूरची कमान राखणाऱ्यांना आणि रेडीओवर टोमॅटो चालविणाऱ्यांना याची अद्याप खबरबात लागलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.