मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ईडी विरुद्ध संजय राऊत असा एक वेगळा सामना राज्यात रंगताना पाहायला मिळत होता. याआधी संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांच्यावर ईडीच्या कारवाईबाबत जोरदार वाद झाल्यानंतर आता थेट शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच ईडीनं कारवाई केली आहे. संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. त्यासंदर्भात आता विरोधीपक्ष असलेल्या भाजपाकडून संजय राऊतांना लक्ष्य केलं जात आहे.
असे असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्याच दिवशी सर्वपक्षीय आमदारांना स्नेहभोजनाचे आयोजन केले. या स्नेहभोजनाला संजय राऊत यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती दर्शवली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यासंदर्भात ईडीनं कारवाई केली असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, ईडीच्या कारवाईमुळे राज्यात भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना असा संघर्ष पेटलेला असताना तसेच, शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली असताना त्याच दिवशी शरद पवार यांचे स्नेहभोजन आयोजित होणे. त्याला भाजपाचे निर्णायक नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणे, हा निव्वळ योगायोग म्हणता येणार आहे. यापूर्वीच गडकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी राज्याच्या राजकारणात कमालीचे सक्रिय झालेले दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यात काही नवीन समीकरणे पहायला मिळण्याची शक्यता आहे.