पिंपरी : विक्रीसाठी मेफेड्रोन (मावमाव) ड्रग्स जवळ बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केली असून, तब्बल 27 लाख ड्रग्स सह 32 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.05) भंडाराडोंगराकडे जाणाऱ्या तुकाराम महाराज कमानी जवळ रस्त्याच्या कडेला ही घटना घडली.
नदीम इनायत पटेल (33, रा. मुंब्रा, ठाणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस हवालदार नामदेव खेमा वडेकर यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या ताब्यात 27 लाख 20 हजार रूपये किंमतीचा 272 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) हा पदार्थ मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून MH 04 KL 8762 ही चारचाकी, दोन मोबाईल फोन आणि अंमली पदार्थ असा एकूण 32 लाख 61 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चाकण परिसरातून एक जण ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शस्त्र विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी चाकण येथून ‘त्या’ कारचा पाठलाग केला. आरोपीने चार-पाच ठिकाणे बदलून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन ड्रग्स विक्री करताना रंगेहाथ पकडले. तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.