पिंपरी : पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस आयुक्तांची ओळख म्हणजे अवैध धंद्यावाल्यांचा कर्दनकाळ अशी आहे. मात्र त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र दिसत आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने नुकतीच चाकण म्हाळुंगे परिसरात कारवाई करुन ‘गुटखा किंग’ला आरोपी केले आहे. या गुटखा किंग सारखे अनेकजण अवैद्य व्यवसाय करत असून संपूर्ण शहरात गुटख्याच्या पुरवठा केला जातो. यावर पोलीस कारवाई करणार का? हा प्रश्न आहे. ‘झिरो’च्या माध्यमातून बेकायदेशीर गुटखा, हॉटेल तसेच गॅस धंद्यातुन लाखोंचा मलिदा लाटला जात आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात अनेक अधिकारी वेगवेगळ्या कारणांनी बदलून आले. पोलीस आयुक्तांनी तर पहिल्या दिवशी अवैध धंद्यावाल्याना हद्दपार व्हावे असे फर्मान सोडले. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली. अवैध धंदे सुरु असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे सांगितले होते. मात्र अनेक ठिकाणी धंदे सुरूच दिसले. दरम्यान हे सर्व धंदे बंद करण्यासाठी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली. या पथकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात छापे टाकून कारवाई करण्यात आली. सर्व स्थरातून पोलीस आयुक्तांचे कौतुक होऊ लागले.
सध्या काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत चित्र वेगळे दिसत आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने छापे टाकूनही लगेचच ते धंदे पुन्हा सुरु होतात. याला नक्की कोणाचा आशीर्वाद मिळत आहे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक सुरक्षा पथकाने गुटख्याची कारवाई करुन गुटखा किंग ओमप्रकाश उर्फ ओमजी बिष्णोई याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र इतर गुटखा किंग अद्याप राजरोसपणे व्यवसाय करत आहेत.
परिसरातील गुटखा किंग हनुमान, राणा, तिवारी, अंकुर, पंकज, अंजुमन, सौरभ, सुमीत आणि इतरांकडून लाखोंचा मलिदा मिळत आहे. विशेष म्हणजे येथून अनेक ठिकाणी बेकायदेशीर गुटखा ‘सप्लाय’ केला जात आहे. तसेच अनेक हॉटेल मध्ये विना परवाना दारू विक्री होत असून या सगळ्यांवर ‘वरदहस्त’ असल्याने सर्व काही सुरु आहे. हे सर्व राजरोसपणे सुरु असून याची माहिती तेथील वरिष्ठांना नसावी हे आश्चर्य आहे.
बेकायदेशीर हॉटेलही जोमात
या परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर हॉटेल सुरु आहेत. याही ठिकाणी कारवाई केल्यानंतर पुन्हा ते सुरू होतात. कॉर्नर, अंबिका, बाली, ‘दादा’चे हॉटेल यासारखी अनेक हॉटेल राजरोसपणे सुरू आहेत. या अवैद्य धंद्यावर आणि आशीर्वाद ठेवणाऱ्यांवर कारवाई करून खोलात जाणार का हे पाहणे गरजेचे आहे.