जादा परताव्याच्या अमिषापोटी 5.62 कोटी रुपयांची फसवणूक
दाम्पत्यास अटक; आरोपींबाबत अधिक माहिती असेल पोलिसांना कळवा
पिंपरी : जास्तीचा परतावा किंवा स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या निवेदिता राहुल गायकवाड आणि राहुल जयप्रकाश गायकवाड या दाम्पत्याला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी 8 जणांची 5 कोटी 62 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 2018 ते 2021 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला आहे.
याबाबत नारायण रघुनाथ चिंघळीकर (रा. गुरुव्दारा चौक, चिंचवड) यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यांचा अर्ज सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी तपासासाठी सांगवी पोलीस ठाण्याकडे पाठवून पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल तांबे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी चौकशी करुन गायकवाड दाम्पत्याला अटक केली आहे. आरोपींनी आणखीन गुंतवणुकदारांची फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निवेदिता गायकवाड (37) आणि राहुल गायकवाड (40 रा. ओम रेसिडेन्सी, अभंग कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी जास्तीचा परतावा किंवा स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पडले. तसेच गुंतवणूकदारांचा विश्वास बसावा यासाठी थोड्या प्रमाणात परतावा देखील दिला. विश्वास बसल्याने अनेकांनी त्यांच्याकडे गुंतवणूक केली. यामध्ये फिर्यादी नारायण चिंघळीकर यांनी गुंतवणूक केली होती. मात्र आरोपींनी त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रारी अर्ज केला होता.
सांगवी पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयपीसी 420, 406, 34, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक केली. तपासादरम्यान आरोपींकडे आणखीन गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याचे निष्पन्न झाले असून ही गुंतवणूक कोट्यावधी रुपयांची आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आरोपी निवेदिता गायकवाड आणि राहुल गायकवाड या दाम्पत्याकडे कोणी गुंतवणूक केली असेल किंवा आरोपींबाबत अधिक माहिती असेल तर सांगवी पोलीस ठाण्याच्या 8530397832 या क्रमांकावर संपर्क साधावा. आरोपींबाबत अधिकची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल.