मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेपासून मशिदीवरील भोंग्यांच्याबाबतची भूमिका लावून धरली आहे. पाडव्यानंतर ठाण्यातील सभेमध्येही त्यांनी भोंग्यांबाबत राज्य सरकारला 3 मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण हे तापलेलं आहे. अशातच राज ठाकरे यांना धमकीचे फोन आल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यांवरून बोलल्यापासून त्यांना धमकीचे फोन येऊ लागले आहेत. या धमकीच्या फोनमुळे राज ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी मनसेने केली आहे. यासंदर्भात मनसेने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. राज ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून धमकीचे फोन येत आहेत. त्यासोबतच त्यांना धमकीचे मेसेजही येत असून हे मेसेज आपण वाचले असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जर हे भोंगे उतरवले नाहीत तर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सर्वांना दिले आहेत. आता राज ठाकरेंनी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी 5 मे ला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आहे, त्यामुळे त्यांना उत्तर प्रदेश सरकारकडूनही सुरक्षा मिळणार आहे. मात्र त्याआधी केंद्र सरकारनेही जर सुरक्षा दिली तर राज ठाकरेंच्या दौऱ्यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसणार आहे.