अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्या, अडचणी जाणून घेणे महत्त्वाचे : अंकुश शिंदे

शहरातील वाहतूक, पार्किंग समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार

0

पिंपरी : पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी चर्चा करणाऱ्या पोलीस आयुक्तांची शहरात जोरदार चर्चा आहे. पोलीस ठाण्यात जाऊन चर्चा करुन पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्यास त्यांच्या सोबत चांगले काम करता येईल असे मत नवीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी व्यक्त केले.

पत्रकारांशी चर्चा करत असताना ते बोलत होते. आपण ज्यांच्या सोबत काम करत आहे, किंवा आपण ज्या संस्थेचा प्रमुख आहे, त्याचे संपूर्ण कार्यक्षेत्र माहिती असणे गरजेचे आहे. सर्व प्रथम संपूर्ण कार्यक्षेत्र माहिती असणे तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचारी यांची माहिती असणे आणि गुन्ह्यांची सद्यस्थिती माहिती असणे आणि ती स्वतःला समजून घेण्यासाठी मी पोलीस ठाण्यात जाऊन माहिती घेत आहे.

यामुळे माझ्या अनेक समस्या आणि अडचणी लक्षात येत आहेत. शहरात फिरत असताना वेगवेगळ्या समस्या समोर दिसत आहेत. यातील वाहतुकीची आणि पार्किंगची समस्या खूप महत्त्वाची असून त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पाहणी, चर्चा केल्याने अनेक प्रश्न समोर येत आहेत.

पोलीस ठाण्याला भेट देणे हे पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांचे नियमीत कामकाजाचा भाग आहे. अजून संपूर्ण हद्दीत फिरणे झालेलं नाही. त्यामुळे एकूण काही परिस्थिती आहे यावर सध्या बोलता येणार नाही, मात्र ज्या समस्या, अडचणी दिसत आहेत त्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न होतील, असे आयुक्त शिंदे यांनी सांगितले.

अंकुश शिंदे यांनी पदभार घेतल्यानंतर हिंजवडी, वाकड आणि चिंचवड पोलीस ठाण्यात जाऊन सविस्तर आढावा घेतला आहे. पदभार स्विकारल्यानंतर लगेचच पोलीस ठाण्यात स्वतः जाऊन ओळख करुन, चर्चा करणारे हे पहिलेच पोलीस आयुक्त आहेत. याची शहरात आणि पोलीस दलात चांगली चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.