भोसरी : दरवाजात सिमेंटचे ब्लॉक, दगडी, विटा आणि लाकडे का टकतो, असा जाब विचारणाऱ्या महिलेला बेदम मारहाण करुन विनयभंग केल्याची घटना भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी अक्षय संजय अग्रवाल, संजय ज्वारीमल अग्रवाल (52) आणि दोन महिला (सर्व रा. भोसरी) यांच्याविरुद्ध आयपीसी 392, 354, 354 (ब), 323, 504, 506, 509, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पीडित महिलेने सोमवारी (दि.26) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.21) रात्री 9 ते 10 च्या दरम्यान पीडित महिलेच्या घरासमोर घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमेंटचे ब्लॉक, दगड, विटा, लाकडे आमच्या दारवाजात का टकतो असे, फिर्यादी महिलेने विचारले. त्यामुळे आरोपी अक्षय याने अश्लील हावभाव करुन फिर्यादीस शिवीगाळ केली. आरोपी अक्षय याच्या आई आणि बहिणीने फिर्यादीस मारहाण केली.
फिर्यादी यांचे पती भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांना सिमेंटचा ब्लॉक मारुन जखमी केले. संजय अग्रवाल याने गैरवर्तन करुन फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. तसेच फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले.
मारहाण करुन आरोपी निघून गेल्यानंतर आरोपी अक्षय याच्या आईने फोन करुन केस मागे घे नाहीतर मी तुझ्यावर विनयभंगाची केस दाखल करीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवारी करीत आहेत.