चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुख यांना क्लीनचिट,अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

0

मुंबई  : 100 कोटींच्या वसुली प्रकरणात चांदिवाल आयोगाने आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे आयोगाने सादर केलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे अनिल देशमुखांना क्लिन चिट मिळणार असल्याची माहिती आहे.

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 20 मार्च 2020 रोजी एक पत्र लिहून मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटमधून दरमहा 100 कोटींची वसूली करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा आरोप करत एक लेटरबॉम्ब फोडला होता. देशमुखांनी हे काम पोलीस निरीक्षक सचिन वाझेकडे सोपवल्याचं या पत्रात नमूद केलं होतं. त्यातच देशमुखांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.

या प्रकरणी आरोपांची शाहनिशा करण्यासाठी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची स्थापना केली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल या न्यायाधीशांची या आयोगाच्या अध्यक्षस्थानी नेमणूक केली. कोविडच्या काळातही या चौकशी आयोगाने आपले कामकाज सुरुच ठेवले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.