मुंबई : मुंबई आणि पुण्यातील बड्या उद्योगपतींशी संबंधित ठिकाणांवर गुन्हे अन्वेषण विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. सकाळपासून सीबीआयने सुरू केलेली ही छापेमारी बँक घोटाळ्याच्या तपासाच्या अनुषंगाने असल्याचे सांगितलं जात आहे. या छापेमारीत बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, शाहिद बलवा आणि विनोद गोयंका या उद्योजकांचा समावेश आहे.
पुण्यामध्ये अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या परिसरात सीबीआयने छापेमारी केली आहे. तसेच, 2G घोटाळ्यात नाव आलेल्या शाहिद बलवा यांच्या कंपन्यांवर देखील धाड टाकली आहे. दरम्यान, सीबीआयने ज्या 3 उद्योगपतींच्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत ते तीनही उद्योगपती राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नजदीकचे मानले जातात. या पार्श्वभूमीवर राजकीय रंग देखील येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, भोसले यांच्या मालमत्तांवरही सीबीआयने छापेमारी केली आहे. त्याचबरोबर मागील अनेक दिवसांपासून अविनाश भोसले हे ED च्या रडारवरही आहेत. काही महिन्यांपूर्वी फेमा कायद्याअंतर्गत कारवाई करत जवळपास 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.