पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाकड येथील मुळा नदीवर दोन वाहनांचा अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीचा फटका पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना बसला. हे समजताच हिंजवडी वाहतूक पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करुन पोलीस आयुक्तांची गाडी मार्गस्थ केली. मात्र यामध्ये किमान 15 मिनिटांहून अधिक काळ गेला.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी दोन सिग्नल संपले तरी वाहने पुढे सरकत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. यात मुंबई-पुणे-मुंबई असणारे दोन महामार्ग शहरातून जातात. यावरही अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
शनिवार, रविवार असल्याने अनेकांना सुट्ट्या आहेत. त्यातच आजच सर्व शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. 30 एप्रिल म्हणजे आजच सर्व विद्यार्थ्यांना निकाल मिळाले असून जुनच्या पहिल्या आठवड्यापर्यत सुट्ट्या आहेत. यामुळे आज द्रुतगती महामार्गावर गावाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी होती.
आज शनिवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त बाणेरच्या दिशेने निघाले होते. दरम्यान वाकड येथील भुजबळ चौकाजवळील मुळा नदी पुलाजवळ दोन वाहनांचा अपघात झाला. यातील ट्रक रस्त्यात बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. या कोंडीत खुद्द पोलीस आयुक्त शिंदे अडकले. हे समाजातच हिंजवडी ट्राफिक पोलिसांनी ट्रक बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर पोलीस आयुक्तांची गाडी मार्गस्थ झाली. मात्र यामध्ये बराच वेळ पोलीस आयुक्तांना वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागले.