पुणे : वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम सुरु असलेल्या एका धार्मिकस्थळाचा स्लॅबचा ढाचा कोसळल्याची घटना आज (सोमवारी) दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली. ही घटना वानवडी परिसरातील जगताप चौकातील अलंकार लॉन समोर घडली आहे. या घटनेत 7 जण जखमी झाले असून 3 जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार जोंधळे यांनी सांगितले की, जगताप चौकामध्ये एका धार्मिकस्थळाचे बांधकाम सुरु असून दुपारी सव्वा चारच्या सुमारास स्लॅबचा ढाचा अचानक कोसळला. यामध्ये अनेक जण जखमी झाले असून ढाचा बाजूला करण्याचे काम सुरु आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.