मुंबई : मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यावरून झालेल्या वादानंतर राजद्रोहाच्या आरोपाखाली खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक केली होती. बारा दिवसानंतर राणा दाम्पत्यांना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, मानदुखीचा त्रास जाणवत असल्याने खा. नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, राणा दाम्पत्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नवनीत राणा यांना मणका आणि कंबरदुखीसह स्पॉन्डिलायसिसचा त्रास आहे. त्यातच न्यायालयीन कोठडीत असताना जमिनीवर बसावे आणि झोपावे लागत असल्यामुळे त्रास वाढल्याची तक्रार त्यांनी केली होती. परंतु, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप राणा दाम्पत्यांनी केला होता. त्यानंतर आताही आमदार रवी राणा यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
आमदार रवी राणा यांनी रुग्णालयात जाऊन नवनीत राणांची भेट घेतली. तेव्हा नवनीत यांना रडू कोसळले आहे. ”कारागृह प्रशासन हे सरकारच्या अत्यारित आहे. म्हणजेच सरकारनेच आमच्यावर कारवाई करुन कारागृहात पाठवलं. मला असं वाटतं की, एका महिलेला किती द्वेषाचं राजकारण करायचं..किती अपमानित करायचं..हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे. त्यामुळे बजरंग भक्त आणि राम भक्त आगामी काळात त्यांना नक्की धडा शिकवतील,” असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.