पोलीस चौकीच्या कामकाज पद्धतीत होणार बदल

यापुढे तक्रार, अर्ज दाखल होणार पोलीस ठाण्यात

0

पिंपरी : प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत काही पोलीस चौकींचे कामकाज सुरु असते. पोलीस ठाण्यातील गर्दी तसेच कामकाज कमी होण्यासाठी किंवा नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस चौकीतच अनेक तक्रारी घेऊन त्याचे निवारण केले जाते. मात्र अनेकदा तक्रारदारांना चौकीत वाईट अनुभव मिळतात. यासाठी चौकीतून चालणाऱ्या कामकाजात बदल करण्याच्या विचारात नवीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आहेत.

शहरातील, पोलीस आयुक्तालयातील विविध समस्या, नवीन बदल याबाबत पोलीस आयुक्त पत्रकारांशी चर्चा करत होते. यावेळी पोलीस ठाण्याच्या पोलीस चौकीच्या कामकाजाबदल चर्चा सुरु असताना पोलीस आयुक्त शिंदे यांनी सांगितले. सध्या पोलीस चौकीत सुरु असलेल्या कामकाजामुळे वेळ आणि मनुष्यबळ वाया जात आहे. एकाच कामासाठी दोन दोन वेळा वेळ जात आहे. यासाठी चौकीच्या कामकाजात बदल करण्याची गरज आहे.

पोलीस चौकीत येणाऱ्या तक्रारी, अर्ज हे यापुढे पोलीस ठाण्यात घेतले जातील. त्यानंतर संबधित पोलीस निरीक्षक त्या गुन्ह्यांचे, अर्जाचे तपास इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे देतील. पोलीस चौक्यांमध्ये यापुढे फक्त तपास आणि इतर कामकाज होणार आहे. चौकीत चालणारे कामकाज पोलीस ठाण्यातुन केले जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडचा भाग पुणे पोलीस आयुक्तालयात असतानाही तत्कालीन पोलीस आयुक्तांनी अश्या प्रकारचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त बदलले आणि पुन्हा पोलीस चौकी कामकाज सुरु झाले. मात्र पोलीस चौकी कामकाज काहींना फायदेशीर असले तरी अनेकांना ते त्रासदायक असल्याचेही वारंवार समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.