पुणे : लाल महालात लावणीवर नृत्य केल्या प्रकरणी मराठी कलाकार वैष्णवी पाटील यांच्यासह दोन अनोळखी व्यक्ती विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. फरासखाना पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. रखवालदार राकेश विनोद सोनवणे (37) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. लाल महाल या पवित्र वास्तूचे पावित्र्य भंग केले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 एप्रिल रोजी, वैष्णवी पाटील हिने आणखी दोन सहकाऱ्यांच्या मदतीने लावणीवर नृत्य करीत असल्याचा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमी मध्ये संतापाची लाट उसळली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचे वास्तव राहिलेल्या या वाड्यात अशा प्रकारचे कृत्य केल्याने शिवप्रेमी संतापले होते. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. त्यानंतर फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
रखवालदार राकेश सोनवणे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे, त्यांनी म्हटले आहे की लाल महाल या पवित्र वास्तूचे पवित्र भंग केले. लावणीवर नृत्य करीत असताना मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु मला माझे काम करू न देता त्यांनी व्हिडीओ शूट केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे अधिक तपास करत आहेत.