गुन्हे शाखा, ‘डिबी’ पथके पोलीस आयुक्तांच्या रडारवर

'स्वतःचेच काम करा, इतर ठिकाणी लुडबुड नको'

0

पिंपरी : अंकुश शिंदे यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी पदभार स्विकारुन एक महिना संपला आहे. या दरम्यान त्यांनी अनेक वेगळे निर्णय घेतले तर अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस आयुक्तांनी शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि गुंडाच्या मुसक्या आवळण्यासाठी काम सुरु केले आहे.

यासाठी शहरातील गुन्हे शाखांवर मोठी जबाबदारी आहे. पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या गुन्हे आढावा मीटिंगमध्ये याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे गुन्हे शाखा बऱ्यापैकी अक्टिव्ह होऊन कामाच्या हालचालीत आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर शहरात तीन गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा, खंडणी/दरोडा विरोधी पथक तयार करण्यात आले. त्यानंतर तीन ऐवजी पाच गुन्हे शाखा करण्यात आल्या. आमली विरोधी पथक सुरु झाले. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या काळात ही पथके अशीच सुरु होती. बिष्णोई यांची बदली झाल्यानंतर कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गुन्हे शाखा वाढविण्यास सुरुवात केली. सर्वात प्रथम सामाजिक सुरक्षा विभाग सुरु केला. पूर्वीच्या पाच गुन्हे शाखा सुरु ठेवल्या. खंडणी आणि दरोडा पथक वेगळे करुन स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी नियुक्ती केली. त्यानंतर गुंडा विरोधी पथक, शस्त्र विरोधी पथक, आर्थिक गुन्हे शाखा अंतर्गत प्रॉपर्टी सेल सुरु करण्यात आला. दरम्यान कृष्ण प्रकाश यांची बदली झाली.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार घेताच अवघ्या चार तासात सामाजिक सुरक्षा विभाग बरखास्त करुन गुन्हे शाखांना एक प्रकारचा संदेशच दिला. यानंतर त्यांनी गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा अहवाल मागवला आहे. सोबतच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या मीटिंग घेऊन योग्य सूचना दिल्या असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली. गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी ‘जे आपले काम आहे, तेवढेच प्रामाणिकपणे करावे’ असे आदेश दिले आहेत. दुसऱ्यांच्या कामात लुडबुड करु नये, समाधानकारक काम करावे असे सांगितले.

पोलीस ठाण्यातील ‘डिबी’ पथक आणि टीम हे त्या पोलीस ठाण्यातील महत्वाचे असते. आपल्या हद्दीतील गुन्हे प्रकटीकरण किंवा अवैध धंद्यावर कारवाई गुन्हे शाखा करेल अशी डिबी पथकाची भूमिका चुकीची आहे. डिबी पथकांनीही चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गुन्हे शाखा आणि डिबी पथकांच्या कामकाजाचा अहवाल पाहून कारवाई होणार आहे. वेळ प्रसंगी काही गुन्हे शाखांची पथके बरखास्त आणि अनेक फेरबदल होण्याची चिन्हे आहेत.

असमाधान कारक कामगिरी असणाऱ्या पथकांवर कारवाई

पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखांच्या मीटिंग घेऊन त्यांना त्यांचे काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. सोबत त्यांच्या कामकाजाचा अहवाल तपासला जात आहे. पोलीस ठाण्याच्या डिबी पथकाचाही अहवाल तपासला जाणार आहे. यामध्ये समाधानकारक कामगिरी आढळून आली नाही तर कारवाई केली जाणार आहे. काही फेरबदल केले जातील तसेच कामगिरी नसणारी पथके बरखास्त केली जातील.
अंकुश शिंदे; पोलीस आयुक्त.

Leave A Reply

Your email address will not be published.