पुणे : शिक्षक भरती परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी तुकाराम सुपे याला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली होती. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी घोटाळा केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी असलेले तुकाराम सुपे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
शिक्षक भरती परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले होते. त्याचबरोबर आरोपी तुकाराम सुपे, सुखदेव ढेरेसह पंधरा जणांविरोधात 3,995 पानांचे हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील प्रितेश देशमुख याला या अगोदर जामीन मंजूर करण्यात आला होता. आता मुख्य आरोपी असलेल्या तुकाराम सुपेलाही जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, 2019 – 20 साली झालेल्या शिक्षक भरती परीक्षेमधील गैरव्यवहाराचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता. या दरम्यान, या परीक्षेच्या निकालातील अंतिम 16 हजार 705 पात्र परीक्षार्थ्यांचे कंपनीकडील डाटासंबंधी तांत्रिक विश्लेषण आणि आरोपींकडून मिळालेला डिजिटल पुराव्याचा एकत्रित तपास सुरू आहे. त्याचबरोबर परीक्षार्थींचे ओएमआर शिटस याचा तपास करून एकूण 7 हजार 880 अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी त्यांच्या मूळ गुणांत वाढ करून त्यांना पात्र केल्याचं समोर आलं आहे.