पिंपरी : दरमहा 40 हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून आठ लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार 1 जानेवारी ते 6 ऑगस्ट 2020 या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडला.
कौशल प्रकाश पांचाल (33, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक गोरख खरात (रा. लोढा बेलमोंडो, गहुंजे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना ‘रियल इस्टेटमध्ये जास्त फायदा आहे. तुम्ही रियल इस्टेटमध्ये माझ्याकडे आठ लाख रुपये गुंतवा मी तुम्हाला दरमहा 40 हजार रुपये देईल व शेवटी राहिलेल्या नफ्यातून 50 टक्के नफा देतो’ असे सांगितले. फिर्यादीकडून आठ लाख रुपये घेऊन त्यांना कोणताही परतावा न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.