पुणे : येरवडा येथील जीएसटी कार्यालयात राज्य कर निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरू करण्यासाठी क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
ज्योत्स्ना रामचंद्र कोरडे (35) असे लाचखोर महिला अधिकार्याचे नाव आहे. पुणे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. एका 46 वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी तक्रार दिली होती.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी ज्योत्स्ना कोरडे या वस्तू व सेवा कर कार्यालय येथे राज्य कर निरीक्षक म्हणून काम करतात. तक्रारदार यांचे गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरू करून क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी जोत्स्ना कोरडे यांनी दोन हजार रुपये लाच मागितली होती. परंतु लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार व्यक्तीने लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली होती.
लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी केली असता कोरडे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून सूचना कोरडे यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.