गायक सिद्धू मुसेवाला यांच्या शरीरावर आढळल्या 19 गोळ्यांच्या जखमा

0

नवी दिल्ली : पंजाबचे गायक आणि काॅंग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. मुसेवाला यांच्या शरीरावर 19 गोळ्यांच्या जखमा आढळून आल्या असून किडनी, यकृत, पाठीचा कणा या ठिकाणी या गोळ्या लागल्याचे पोस्टमार्टम अहवालात म्हटले आहे. जखमी झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच मुसेवाला यांचा मृत्यू झाल्याचे अहवालातून उघड झाले आहे.

पोस्टमार्टम अहवालात नेमकं काय म्हटलंय?

गायक सिद्धू मुसेवाला यांच्या शरीरावर 19 गोळ्यांच्या जखमा असून शरीरावर एकूण २३ जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. मुख्यतः किडनी, यकृत, पाठीचा कणा या ठिकाणी मुसेवाला यांना या गोळ्या लागल्या होत्या. यातील 14 ते 15 गोळ्या शरीराच्या पुढच्या भागाला लागल्या होत्या तर तीन ते चार गोळ्या उजव्या हाताच्या कोपरावर लागल्या होत्या. गोळ्यांच्या जखमा तीन ते पाच सेमीपर्यंत खोलवर असल्याचे पोस्टमार्टम अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान एकदम गोळ्या झाडून हल्ला झाल्याने अवघ्या 15 मिनिटांतच मुसावाला यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

पंजाबचे प्रसिद्ध गायक आणि काॅंग्रेस नेते सिद्धू मुसेवाला रविवारी 29 मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात थार जीपमधून प्रवास करत असताना अज्ञातांनी अचानक गोळीबार करत हल्ला केला आणि यातच मुसेवाला यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांचा एक मित्र आणि एक नातेवाईक सुद्धा जखमी झाले. दरम्यान या हल्ल्यानंतर हल्ला कोणी केला यावर उलटसूलट चर्चा सुरू असताना सोशल मिडीयावर पोस्ट करून लॉरेन्स बिश्नोईनं या हत्येची जबाबदारी स्विकारली.

यंदाच्या वर्षी सिद्धू मुसेवाला यांनी काॅंग्रसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती, परंतु उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना हार मिळाली होती. दरम्यान, पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आणि अगदी दुसऱ्याच दिवशी मुसावाला यांची हत्या करण्यात आली. मुसागावात मंगळवारी (दि. 31मे) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.