कार चोरट्यांचा पोलिसांवर हल्ला; पोलीस निरीक्षक, दोन कर्मचारी किरकोळ जखमी

निरीक्षकांनी 'सर्व्हिस रिव्हॉल्व्हर' काढल्याने चोरट्यांनी काढला पळ

0

पिंपरी : शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास निगडी, यमुनानगर भागातून रस्त्यावरील इको स्पोर्ट्स कार चोरट्यांनी चोरुन नेली. दरम्यान गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग करुन चोरट्यांना अडवले. त्यावेळी चोरट्यांनी पोलिसांवर चाकू हल्ला केला. यामध्ये पोलीस किरकोळ जखमी झाले. दरम्यान पोलीस निरीक्षकांनी दरवाजातून हात घालून गाडीची चावी काढली आणि ‘सर्व्हिस रिव्हॉल्व्हर’ काढून चोरट्यांच्या दिशेने रोखली. त्यावेळी अंधाराचा फायदा घेत चोरटे डोंगराच्या दिशेने पळाले. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास निगडी-देहूरोड रस्त्यावर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; यमुनानगर परिसरातून चोरट्यांनी इको स्पोर्ट्स कार चोरली. याच दरम्यान रात्र गस्तीवर असणारे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड चिखली पोलीस ठाण्यात नोंद करुन निगडीच्या दिशेने निघाले होते. पोलीस गाडी पाहून तक्रारदार त्यांच्याकडे आला आणि कार चोरीला गेल्याचे सांगितले. जोगदंड यांनी याबाबत कंट्रोलला फोन करुन माहिती दिली आणि नाकाबंदी लावण्याबाबत कळवले.

जोगदंड आणि त्यांच्या सोबत असणारे पोलीस अंमलदार निशांत काळे आणि प्रदीप गुट्टे हे भक्ती-शक्ती चौकातुन जात असताना चोरीला गेलेली इको कार दिसली. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग सुरु केला. दरम्यान निगडी-देहूरोडच्या सीमेवर समोर एक ट्रक असल्याने चोरट्यांनी कारचा वेग कमी केला. त्यावेळी पोलिसांनी पोलीस गाडी आडवी लावली. क्षणार्धात खाली उतरून निरीक्षक जोगदंड यांनी चावी काढण्यासाठी दरवाजाच्या खिडकीतून हात घातला. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या हातावर मारहाण केली. काळे आणि गुट्टे यांनी दोन्ही बाजूने घेरले. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्याकडील छोटी तलवार आणि चाकूने पोलिसांवर हल्ला केला. यावेळची परस्थिती पाहून जोगदंड यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हर काढल्याने चोरट्यांनी पळ काढला.

घडलेली घटना आणि पोलिसांनी केलेल्या धाडसाची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे घटनास्थळी पोहचले. त्यांनी पोलीस निरीक्षक आणि दोन्ही पोलीस अंमलदारांचे कौतुक करुन शबासकी दिली. पोलिसांनी कार  ताब्यात घेतली असून त्यातून चोरीसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.